महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यातील तीन बडे नेते दिल्लीत; सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग, अमित शाहांसोबत बैठक - MAHAYUTI DELHI MEETING

महायुतीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत बैठक बोलाविली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra New gov formation updates
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 8:26 AM IST

Updated : Nov 28, 2024, 9:50 PM IST

मुंबई/नवी दिल्ली -महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? यावर निर्णय घेण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्लीत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत आहेत.

Live Updates :

लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी महत्वाचं :"बैठक सकारात्मक होईल..कोणत्याही पदापेक्षा 'लाडका भाऊ' हे पद माझ्यासाठी महत्वाचं आहे. लाडका भाऊ आता दिल्लीत दाखल झाला आहे. बैठकीनंतर सर्व तुम्हाला सांगेन," अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच दिली. त्यांच्यासोबत शंभूराज देसाई आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आहेत.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना : आज सकाळपासूनच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घरी शिवसेनेचे अनेक नेते त्यांना भेटायला येत होते. यामध्ये शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांचा समावेश होता. यांची बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. जाताना त्यांनी "संध्याकाळपर्यंत निर्णय सांगतो" अशी प्रतिक्रिया दिली.

ठाण्यात झाली बैठक : एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घरी सकाळपासून बैठकींचं सत्र सुरू होतं. काल पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जे नेते उपस्थित राहू शकले नाहीत ते आज सकाळपासूनच एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या ठाण्यातल्या घरी आले होते. या नेत्यांमध्ये खूप वेळ चर्चा देखील झाली आणि चर्चेनंतर एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

आजची बैठक महत्त्वाची :भाजपाकडून जो निर्णय होईल, तो निर्णय शिवसेना मान्य करील अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद जाहीर केली. त्यामुळे महायुतीमधील मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेला पेच सुटल्याचं स्पष्ट झाले. महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरील आजची बैठक महत्त्वाची असणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाबात अंतिम निर्णय घेताना अमित शाह हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्रिपदी कोण असणार? याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का? हे पद शिवसेनेच्या कोणत्या मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

पंतप्रधानांसह अमित शाह आमचेदेखील नेते -यापूर्वी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे याची निवड व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार म्हस्के यांनी भूमिका बदलली आहे. भाजपाच्या निर्णयाला शिवसेनेला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, " पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महायुतीचे , आमचेदेखील नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपला मौल्यवान वेळ दिला. आम्ही मिळवलेला विजय अंशतः त्यांच्यामुळेच आहे".

नाना पटोले यांची महायुतीवर टीका -विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवूनही मुख्यमंत्रिपदाची अद्याप निवड झालेली नाही. या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे भाजपचे नेतृत्व काय आहे, हे समजू शकणार नाहीत. मुख्यमंत्री चेहरा जाहीर करण्यास उशीर होण्यामागं हे एक मोठं कारण आहे."

सत्तेचे भुकेले झाले -शिवसेनेच्या (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सरकार स्थापन होण्यास उशीर होत असल्यानं महायुतीवर टीका केली. त्यांनी म्हटलं, " देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असेल तर ते लवकर जाहीर करावं. तुम्ही कशामुळे अडले आहात? महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून का वंचित ठेवत आहात? तुम्ही त्यांना संशयात का ठेवत आहात? महाराष्ट्रातील नेतृत्वाच्या संकटाकडे दुर्लक्ष करून सत्तेचे भुकेले झाले आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले तरीही स्पष्टता नाही".

हेही वाचा-

  1. मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडल्याचे एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट संकेत, मोदी-शाह जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचं पूर्णपणे समर्थन
  2. दिल्लीश्वरांच्या वटारलेल्या डोळ्यांना बंडखोर घाबरत नाहीत-संजय राऊत
Last Updated : Nov 28, 2024, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details