मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात अजित पवार यांनी भरघोस यश संपादन केलं. त्यानंतर गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी तब्बल सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मात्र त्यानंतर अजित पवार यांना पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागानं 7 ऑक्टोबर 2021 ला अजित पवार यांच्या विविध कारखान्यांसह इतर अशी 1 हजार कोटीची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं ही संपत्ती बेनामी नसल्याचं स्पष्ट करत अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे हा अजित पवार यांना मोठा दिलासा असल्याचं बोललं जाते.
दिल्ली लवादाकडून दिलासा :आयकर विभागानं अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांच्या मालमत्तांसह नातेवाईकांशी संबंधित असलेल्या मालमत्ता ऑक्टोंबर 2021 मध्ये छापा टाकून जप्त केल्या. यामध्ये नरिमन पॉईंट येथील निर्मल टावर येथील मालमत्तेचाही समावेश होता. गुरुवारी शपथविधी सोहळा होण्यापूर्वी आदल्या दिवशी बुधवारी दिल्लीत अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशीच अजित पवार यांना दिल्ली लवादाकडून दिलासा मिळाला आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवारांनी विरोधकांचे आरोप फेटाळले :या प्रकरणावर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात असताना दुसरीकडं अजित पवार यांनी मात्र लवादाने यासंबंधी दिलेला निर्णय हा एक प्रक्रियेचा भाग असल्याची प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की, "कुठल्याही कोर्टाचा निकाल हा एका दिवसात येत नाही. मी इतकी वर्ष विरोधकांसोबत काम केलं आहे. जर का, मी भ्रष्टाचारी किंवा दोषी असतो तर त्यांनी माझ्यासोबत काम केलं असतं का? म्हणून उगाच काहीतरी बोलायचं, आरोप करायचा, म्हणून करू नका. विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मला जिथे न्याय मिळेल असं वाटत होतं, मी तिकडे गेलो आणि न्याय मागितला. जेव्हा मी विरोधकांसोबत असतो तेव्हा चांगला असतो. विरोधकांच्या आरोपात कुठलंही तथ्य नसून राजकीय दृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे."
नातेवाईकांशी संबंधित असलेल्या संस्थांवर छापे :अजित पवार यांच्या कुटुंबाच्या जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना, दिल्लीतील एक सदनिका, मुंबईतील संकुल, गोव्यातील एका रिसॉर्टसह महाराष्ट्रातील विविध 27 ठिकाणच्या जमिनींचा समावेश आहे. याचवर्षी 2021 मध्ये आयकर विभागानं अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या संस्थांवर छापे टाकले. त्याचबरोबर मुंबईतील दोन रिअल इस्टेट कंपन्या यांच्यावर छापे टाकल्यानंतर 184 कोटीचे बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्या.
अजित पवारांसाठी फार मोठा दिलासा :अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. संबंधित कारवाई स्थगित करण्याबरोबर जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता सोडवण्यात याव्यात, अशा मागण्या वारंवार करण्यात आल्या. या विनंतीनंतर स्थगितीची ऑर्डर काढण्यात आली. परंतु जप्त केलेल्या मालमत्ता सोडवण्यास नकार दिला गेला. अखेर शुक्रवारी दिल्ली ट्रिब्युनल कोर्टानं अजित पवार यांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
सुषमा अंधारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतली. त्यानंतर लगेच त्यांची एक हजारापेक्षा जास्त जप्त केलेली संपत्ती बेनामी नसल्याचं दिल्लीतील न्यायाधिकरणानं घोषित केलं. त्यावर आता चांगलंच राजकारण रंगत आहे. उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवर पोस्ट शेयर केली, त्यात त्यांनी, "आयकर विभागाने जप्त केलेली अजित दादांची मालमत्ता सही सलामत दादांना परत केली! लोकशाही बळकट करण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले! लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा भावना गवळी,यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता!"
हेही वाचा :
- Ajit Pawar On Jarandeshwar Case : जरंडेश्वर प्रकरणात क्लीन चिट नाही, चौकशी सुरू.. अजित पवारांकडून खुलासा
- जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा: अजित पवारांच्या अडचणीत वाढ?
- अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..