प्रयागराज- महाकुंभ मेळ्यातील शेवटचा दिवस आणि महाशिवरात्री असा 'मुहूर्त' साधत मध्यरात्रीपासून भाविकांनी संगमावर स्नानासाठी गर्दी केली. पहाटे ४ वाजेपर्यंत सुमारे २५ लाख लोकांनी संगमावर स्नान केलं.
महाशिवरात्रीनिमित्त सुमारे २ ते ३ कोटी लोक स्नान करणार असल्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत महाकुंभ मेळाव्यातील स्नानाचा आजपर्यंतचा आकडा ६७ ते ६८ कोटींच्या जवळपास पोहोचू शकतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता गर्दीवर नियंत्रण आणण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून शहरात येणाऱ्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी १.३० कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केलं. मंगळवारीही १.११ कोटींहून अधिक लोक त्रिवेणी संगमावर पोहोचले होते. १३ जानेवारीपासून ६५ कोटी भाविकांनी महाकुंभ मेळाव्यात स्नान केलं आहे.
जवळच्या घाटावर स्नान करण्याचं प्रशासनाकडून आवाहन-संगमावर पवित्र स्नानाकरिता जाण्याकरिता भाविकांची गर्दी होत आहे. पोलिस प्रशासनाकडून सर्व भाविकांना जवळ असलेल्या घाटांवर स्नान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दक्षिण झुंसीहून येणारे भाविक संगम द्वार ऐरावत घाटावर स्नान करू शकतात. तर उत्तर झुंसीहून येणारे भाविक संगम हरिश्चंद्र घाट आणि संगम जुना जीटी घाट येथे स्नान करू शकतात. तसेच, संगम द्वार भारद्वाज घाट, संगम द्वार नागवासुकी घाट, संगम द्वार मोरी घाट, संगम द्वार काली घाट, संगम द्वार राम घाट आणि संगम द्वार हनुमान घाट येथे भाविक स्नान करू शकतात.