प्रयागराज : संगम शहरात 13 जानेवारीपासून दिव्य आणि भव्य असा महाकुंभ मेळावा (mahakumbh 2025) सुरू झालाय. जगभरातून भाविक इथं येत आहेत. या मेळाव्याच्या गर्दीत काही लोक भारतीय संस्कृतीनं प्रभावित होऊन इथं आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेतील 55 वर्षीय योग शिक्षिका कुशला आहेत.
काय म्हणाल्या कुशला? : 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कुशला यांनी सांगितलं की, "त्यांना सनातन धर्माविषयी खूप प्रेम आहे. त्यामुळंच त्यांनी योगशिक्षक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. ही आसक्ती त्यांना सातासमुद्रापार महाकुंभापर्यंत खेचून आणेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. प्रयागला आल्यावर त्यांनी घाटावर पोहोचून गंगा मातेला नमस्कार केला. स्वतःवर पाणी शिंपडलं. आता त्या प्रयागराजमध्ये राहून महाकुंभमेळ्याच्या साक्षीदार बनल्या आहेत."
अमेरिकेतून भारतात आलेल्या कुशला म्हणाल्या की, "मी महाकुंभबद्दल खूप ऐकलं होतं. मी वाराणसीला पोहोचले होते. तेव्हा प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं समजल्यावर मी स्वत:ला थांबवू शकले नाही. मला वाटलं की सनातन धर्माशी स्वतःला जोडण्याचा अनुभव घेण्याची ही उत्तम संधी आहे."