नवी दिल्ली Lok Sabha candidates Congress : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 43 नावं आहेत. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, आम्ही पहिली यादी जाहीर केली आहे. आता आम्ही दुसरी यादी प्रसिद्ध करत आहोत. काल पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर ही यादी निश्चित करण्यात आली आहे, असंही वेणुगोपाल म्हणाले आहेत. या दुसऱ्या यादीमध्ये आसाम, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची नावं आहेत.
सर्व समाज घटकांना स्थान : काँग्रेस अगोदरही एक यादी जाहीर केली आहे. त्यावेळी 6 राज्यातील जवळपास 62 जागांवर चर्चा करण्यात आली होती. त्यापैकी 43 जागांवरील उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने आज जाहीर केली. 43 पैकी 33 उमेदवारांचे वय हे 60 पेक्षा कमी आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत खुल्या प्रवर्गातील १०, ओबीसी 13, अनुसूचित जाती 10, अनुसूचित जमाती 9, मुस्लीम 1 असे 43 उमेदवार आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही सर्व समाज घटकांना स्थान दिल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी यावेळी केला.
बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश : गौरव गोगोई यांना आसामच्या जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून तिकीट देण्यात आलं आहे. राजस्थानच्या चुरूमधून राहुल कासवान आणि जालोरमधून वैभव गेहलोत यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने राहुल कासवान यांचं तिकीट कापलं होतं. यानंतर त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पहिली यादीत 39 जागांवर उमेदवार : पहिल्या यादीत काँग्रेसने 39 पैकी 20 नवीन उमेदवार उभे केले आहेत. 19 जागांवर जुने उमेदवार कायम ठेवण्यात आले आहेत. राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. शशी थरूर यांना सलग चौथ्यांदा तिरुअनंतपुरम, केरळमधून तिकीट मिळाले आहे.