हैदराबाद : हैदराबादमध्ये अंधांच्यासाठी एक उपयुक्त चष्मा तयार करण्यात आला आहे. हा AI-आधारित स्मार्ट चष्मा नियमत व्यवहारात तसंच चालता-बोलताना दृष्टिहीन व्यक्तींना सक्षम करण्यासाठी विकसित केला गेला आहे. KIMS फाउंडेशन आणि रिसर्च सेंटरच्या नेतृत्वाखाली तयार केलेले हे चष्मे पारंपरिक पांढऱ्या काठीची गरज दूर करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यातून अंधांचे जीवन अधिक सुकर करण्यात क्रांतिकारक ठरू शकतात.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते गुरुवारी या चष्म्यांचं वितरण आणि अनावरण करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमात डॉ. बोलिनेनी भास्कर राव, KIMS हॉस्पिटलचे सीएमडी, डॉ. व्ही. भुजंगा राव, माजी DRDO शास्त्रज्ञ आणि डॉ. जी.एन. राव, LV प्रसाद आय इन्स्टिट्यूटचे संस्थापक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यावेळी म्हणाले की, अंधांसाठी विकसित करण्यात आलेला AI-स्मार्ट चष्मा त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश आणेल आणि भारतातील 2 कोटी दृष्टिहीन लोकांना आशा देईल. या नाविन्यपूर्ण चष्म्यांची रचना केल्याबद्दल त्यांनी KIMS फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (KFRC) टीमचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्यपाल वर्मा यांनी AI चष्मा लोकांना आणि वस्तू ओळखणे यासारख्या वैशिष्ट्यांसह मोफत देण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
KIMS हॉस्पिटलचे CMD डॉ. बोलिनेनी भास्कर राव यांनी या चष्म्यांमुळे अंधांचा आत्मविश्वास वाढेल यावर प्रकाश टाकला. त्यांनी जाहीर केले की पहिल्या टप्प्यात 100 व्यक्तींना चष्मा मिळाला आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वापरात सुलभता येण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
LV प्रसाद हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ जी एन राव यांनी अंधत्व आणि दृष्टिदोष या वाढत्या आव्हानावर मात करण्यास याचा उपयोग होईल असं सांगितलं. अंधत्व असलेल्यांसाठी अधिक स्मार्ट उपकरणे तयार करण्याच्या उद्देशाने एलव्ही प्रसाद हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या संशोधनाची त्यांनी माहिती दिली.
केएफआरसीचे अध्यक्ष आणि डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ डॉ. व्ही भुजंगा राव यांनी सांगितले की, प्रमुख स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि वैद्यकीय सेवामार्फत हे चष्मे अंधांना वितरित केले जातील.
KIMS फाउंडेशनच्या AI चष्म्याचे विद्यार्थ्यांना वाटप (ETV Bharat) AI चष्म्याची प्रमुख वैशिष्ट्ये:
- फेस रेकग्निशन:यामध्ये 400 चेहेरे साठवून ठेवण्याची क्षमता आहे. वापरकर्त्यांना कुटुंब, मित्र आणि ओळखीच्या लोकांना नावाने ओळखण्यास यातून मदत मिळते.
- नेव्हिगेशन सहाय्य: यामुळे यातील साठवलेल्या माहितीच्या वापरातून चष्मा वापरकर्त्यांना घर, कार्यालय किंवा महाविद्यालयासारख्या ठिकाणी काठीशिवाय वावरता येईल. तसंच त्यांना रिअल टाइममध्ये अडथळ्यांबद्दल माहिती मिळेल.
- वाचन सहाय्य : पुस्तके, चिन्हे आणि दस्तऐवज मोठ्याने वाचण्यासाठी मजकूर-ते-स्पीच कार्यक्षमतेसह हे चष्मे सुसज्ज आहेत.
- लाइटवेट डिझाईन :या चष्म्याचं वजन फक्त 45 ग्रॅम आहे. ज्यामुळे ते जास्तवेळ परिधान करणं सोपं होतं.
या एका चष्म्याची अंदाजे किंमत 10,000 रुपये आहे. हे चष्मे सध्या कोणत्याही नफ्याशिवाय वितरित केले जातात. सुरुवातीच्या टप्प्यात, 100 चष्मे अंध विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. यानंतर वापरकर्त्यांचा अनुभव आणि त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित पुढील विकासाची योजना राबवण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. भुजंगा राव यांनी स्पष्ट केलं की, हे तंत्रज्ञान विकसित होत असताना, चष्मा अधिक परवडणारा आणि जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होणं अपेक्षित आहे.
आधुनिक चष्मा कसं कार्य करतो -हा चष्मा संगणक दृष्टी आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम एकत्रित करतो, USB-रिचार्जेबल बॅटरीद्वारे तो चार्ज करता येतो. वापरकर्त्यांना एक सहयोगी ॲप घ्यावं लागतं. ज्यातून चष्म्यांना पत्ते, चेहरे आणि मार्ग यासारखी महत्त्वाची माहिती संग्रहित करता येते.
या चष्म्यांच्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींचे जीवन अधिक सुखकर होण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे, त्यांना वाचण्यास, चालता-फिरताना आत्मविश्वास देणारे आहे. या क्षेत्रात एआयचा वापर करुन प्रगतीची भरारी घेण्यास यातून प्रेरणा मिळणार आहे यात शंकाच नाही.
हेही वाचा..
- एका हाताने टाळी वाजवण्याचा अंध तरुणानं केला पराक्रम, इंडीयाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- अंध असूनही बनले हरहुन्नरी कलाकार; रेडिओ कानाला लावून शिकणाऱ्या नंदकिशोर घुलेंची वाचा प्रेरणादायी कहाणी
- नेत्रदान चळवळीतून साकारला राज्यातील पहिला 'अंध बांधवांचा बचत गट'; चळवळीला अनेकांचा हातभार