बंगळुरू Free Food to Voting Customers : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी (26 एप्रिल रोजी) मतदान होणार आहे. लोकसभा मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 89 जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या टप्प्यात कर्नाटकातील लोकसभेच्या 14 जागांवरही मतदान होणार आहे. यातच कर्नाटक उच्च न्यायालयानं बंगळुरु हॉटेल असोसिएशनच्या ग्राहकांना मोफत जेवण देण्याच्या निर्णयाला परवानगी दिलीय. राज्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, हा त्यामागचा उद्देश आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निर्णय : न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठानं बीबीएमपीच्या आक्षेपाला आव्हान देणाऱ्या बंगळुरु हॉटेल असोसिएशन आणि निसर्ग ग्रँड हॉटेलनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते आणि याचिकाकर्त्या संघटनेच्या वकिलांनी सांगितलं की, हा निर्णय कोणत्याही राजकीय द्वेषातून घेण्यात आलेला नाही. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. याआधीही आम्ही मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत खाऊचं वाटप केलं होतं, असं याचिकाकर्त्यानं म्हटलंय. त्यामुळं आमच्या निर्णयाला परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडं केली.