गडग (कर्नाटक) Karnataka Gadag Murder Case : गदग नगरपरिषदेच्या उपाध्यक्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्येप्रकरणी गडग शहर पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली. मालमत्ता विकण्याच्या वादातून मुलानंच वडील तसंच सावत्र आईची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं. मात्र, या हल्ल्यातून आई-वडील वाचले असून, इतर नातेवाईकांची हत्या झालीय. कार्तिक बकाले (27), परशुराम हादिमानी (55), लक्ष्मी हादिमनी (45), आकांक्षा हादिमानी (16) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कार्तिकचा भाऊ, सूत्रधार विनायक बकालेसह 8 जणांना अटक केली. या प्रकरणी 19 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास गडग शहरातील दसरगल्ली येथे चार जणांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आतापर्यंत 8 जणांना अटक : उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांनी सोमवारी गडग येथे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ''तीन दिवसांत, गडगचे पोलीस अधीक्षक बी.एस नेमागौडा यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकानं या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. गडग परिषदेचे उपाध्यक्ष सुनंदा यांचा सावत्र मुलगा विनायक बकाले (31) हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यानंच या हत्येची सुपारी दिली. या हत्या प्रकरणात गडग शहरातील फैरोज काझी (29), जिशान काझी (24), मीरज येथील साहिल काझी (19), सोहेल काझी (19), सुलतान शेख (23), महेश साळोंके (21), वाहिद बेपारी (21) यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी विनायक बकाले हा प्रकाश बकाले यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे."