मुंबई : मूळच्या उत्तराखंडच्या राहणाऱ्या सुचेता जेटली यांना टाकाऊ प्लेटपासून टिकाऊ आणि सुबक वॉल प्लेटिंग करण्याची कल्पना सुचली. त्या उत्तराखंडमध्येच व्यवसाय करतात. सुचिता यांनी सांगितलं की, "माझे पती सैन्य दलात कर्नल या पदावर कार्यरत आहेत. सैनिक म्हटलं की धाकधूक ही आलीच. त्यामुळे घरी मी आणि माझा मुलगा ध्रुव आम्ही दोघंच असतो. आम्हाला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी माझा मुलगा पेंटिंग करायचो. आपण काहीतरी वेगळं करू, हा विचार करत असतानाच माझ्या मुलाला कल्पना सुचली की, आपण टाकाऊ प्लेटपासून काहीतरी चांगलं केलं तर? मग आम्ही घरातील काही जुन्या प्लेट घेतल्या. त्या प्लेटला स्वच्छ धुऊन त्याच्यावर पेंटिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीचे काही प्रयत्न फसले. मात्र, नंतर आम्ही बऱ्याच सुंदर प्लेट तयार केल्या. सुरुवातीला हा आमचा छंद होता. केवळ छंद म्हणून या प्लेट रंगवत होतो."
लोकांना आपडल्याने व्यवसायात रुपांतर : "आम्ही फावल्या वेळेत केलेलं हे पेंटिंग माझ्या मिस्टरांना खूप आवडलं. ते जेव्हा जेव्हा सुट्टीवर यायचे, तेव्हा काही प्लेट त्यांच्या मित्रांना भेट म्हणून घेऊन जायचे. माझे पती सैन्य दलात अधिकारी असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत असतात. त्यामुळे नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे भेट म्हणून या प्लेट घेऊन जातात. अशी गिफ्ट देण्यापासून या वॉल प्लेटिंगची सुरुवात झाली.
आम्ही देखील एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर गिफ्ट म्हणून या वॉल प्लेट देऊ लागलो. कालांतराने लोकांनादेखील आमची ही कला आवडायला लागली. आम्ही त्याचं व्यवसायात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला-महिला उद्योजक सुचेता जेटली
प्लेट ग्राहकांपर्यंत कुरिअरने पोहोचवल्या जातात : "2017 मध्ये आम्ही एक वेबसाईट बनवली. त्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं या व्यवसायाला सुरुवात केली. अगदी काहीच दिवसात आम्हाला अनेकांचे ई-मेल, फोन आणि मेसेज येऊ लागले. लोकांची मागणी इतकी वाढली की आम्हाला त्या ऑर्डर वेळेत पूर्ण करणे कठीण होऊ लागलं. अखेर माझ्या मुलाने 'आपण काही महिलांना हे काम शिकवूयात का?' असं विचारलं. मलादेखील मदतीची गरज असल्यानं आम्ही ग्रामीण भागातील होतकरू महिलांना मोफत ही कला शिकवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अगदी थोड्या महिलांना आम्ही याचं प्रशिक्षण दिलं. मात्र, आज आमच्यासोबत उत्तराखंडमधील विविध गावातील तब्बल 50 महिला या व्यवसायात जोडल्या गेल्या आहेत. त्यातून महिलांना रोजगार मिळाला आहे. या महिला आम्ही सांगितल्याप्रमाणे पेंटिंग करतात. त्यांना आम्ही ग्राहक उपलब्ध करून देतो आणि या वॉल प्लेट ग्राहकांपर्यंत कुरिअरनं पोहोचवल्या जातात, असंही सुचेता यांनी यावेळी सांगितल.