रांची Hemant Soren Grants Bail :जमीन गैरव्यवहार प्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली होती. या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे. हेमंत सोरेन यांना ईडीनं 31 जानेवारीला अटक केली. न्यायमूर्ती रंगन मुखोपाध्याय यांच्या न्यायालयानं त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. 13 जून रोजी हेमंत सोरेन यांचे वकील आणि अंमलबजावणी संचालनालयाचे एएसजी एस व्ही राजू यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला. ईडीनं रांचीच्या बडगई भागात 8.86 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी 31 जानेवारीला हेमंत सोरेन यांना अटक केली. तेव्हापासून ते रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल कारागृहात बंद होते. आज दुपारी त्यांची सुटका करण्यात आली.
जमीन व्यवहरात केली होती अटक :जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचं असल्याचं न्यायालयात सांगितलं होतं. ही जमीन हस्तांतरित करता येणार नसल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणात मनी लाँड्रिंग झालेली नाही, असा दावा हेमंत सोरेन यांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. हेमंत सोरेन यांनी या जमिनीबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे. मात्र ही जमीन ताब्यात घेण्यासाठी हेमंत सरेन यांनी अधिकाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप ईडीच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला.