नवी दिल्ली Congress pays tribute to former PM Jawaharlal Nehru :काँग्रेस नेत्यांनी सोमवारी (27 मे) माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त शांती वन, नवी दिल्ली येथील त्यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्यसभा खासदार अजय माकन आदी उपस्थित होते.
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले? :जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात खरगे यांनी म्हटले की, "आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अतुलनीय योगदानाशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे. त्यांनी भारताला वैज्ञानिक, आर्थिक, औद्योगिक आणि विविध क्षेत्रात पुढं नेलं. लोकशाहीचे समर्पित संरक्षक, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत."
एकता हा आपल्या सर्वांचा राष्ट्रधर्म-पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, " देशाचं रक्षण, देशाची प्रगती, देशाची एकता हा आपल्या सर्वांचा राष्ट्रधर्म आहे. आपण वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतो. वेगवेगळ्या राज्यांत राहतो. वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो. परंतु यामुळं आपल्यामध्ये कोणतीही भिंत निर्माण होऊ नये. देशाच्या प्रगतीत सर्वांचा समान वाटा आहे. आपल्या देशातील काही लोक खूप श्रीमंत आणि बहुतेक लोक गरीब असावेत, असं आपल्याला वाटत नाही. आजही काँग्रेस पक्ष त्याच ‘न्याय’ मार्गावर चालत आहे, " असे काँग्रेस अध्यक्षांनी आवर्जून नमूद केलं.