नवी दिल्ली Hyderabad Liberation Day : केंद्र सरकारनं मंगळवारी हैदराबादसाठी मोठी घोषणा केलीय. इथून पुढं दरवर्षी 17 सप्टेंबर हा 'हैदराबाद मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केलीय. त्यात म्हटलंय की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्यानंतरही हैदराबादला 13 महिने स्वातंत्र्य मिळालं नाही. हैदराबाद हे निजामाच्या अधिपत्याखाली होतं. 'ऑपरेशन पोलो' नावाच्या पोलिस कारवाईनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा परिसर निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला.
अधिसुचनेत काय : या अधिसूचनेमध्ये म्हटलंय की, "हैदराबाद मुक्त करणाऱ्या हुतात्म्यांची आठवण ठेवण्यासाठी आणि तरुणांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी, भारत सरकारनं दरवर्षी 17 सप्टेंबर हा 'हैदराबाद मुक्ती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे." 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा रझाकारांनी भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध केला. त्यांनी हैदराबादला पाकिस्तानात सामील होण्यासाठी किंवा मुस्लिम अधिराज्य होण्यासाठी आवाहन केलं होतं. हा प्रदेश भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी स्थानिक लोकांनी रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध धैर्यानं लढा दिला. रझाकार या खासगी सैन्यदलानं येथील लोकांवर अत्याचार केले होते. त्यांनी हैदराबादमधील तत्कालीन निजाम राजवटीचं रक्षण केलं होतं.