नवी दिल्ली Human Trafficking And Cyber Fraud Case : मानवी तस्करी आणि सायबर फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं ( NIA ) देशभरात छापेमारी सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. ही छापेमारी स्थानिक पोलीस दल आणि एनआयएच्या संयुक्त पथकाकडून करण्यात येत आहे. देशातील तब्बल 15 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी ठिकाणांवर शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी एनआयएच्या पथकानं वडोदऱ्यातून मनीष हिंगू, गोपालगंजवरुन पहलद सिंग, दिल्लीतून नबियालम रे, गुरुग्राममधून बलवंत कटारिया आणि चंदीगडमधून सरताज सिंग यांना अटक केली आहे.
एनआयएकडून देशभरात छापेमारी :मानवी तस्करी आणि सायबर फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं स्थानिक पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या संयुक्त विद्यमानं देशभरात छापेमारी केली. या छापेमारीत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब इथं तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात एनआयएनं मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं, रजिस्टर, पासपोर्ट, बोगस रोजगार पत्रं आदी साहित्य जप्त केलं आहे. एनआयएच्या पथकानं आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.