अहमदाबाद Mahadev Betting App :सट्टेबाजीमुळे चर्चेत असलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात गुजरात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. कच्छ पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचे नेटवर्क चालवणाऱ्या महादेव बेटिंग ॲपच्या आरोपीला अटक केली. कच्छ बॉर्डर रेंजचे आयजी चिराग कोरडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून गुजरातमधील पाटण येथे आलेल्या महादेव ॲप डेव्हलपर भरत चौधरीला कच्छ बॉर्डर रेंज पोलिसांनी अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे अटक :डीआयजी चिराग कोराडिया यांना गुप्त माहिती मिळाली होती की, भरत मामूजी चौधरी नुकताच दुबईहून त्याच्या मूळ गावी पाटणला आला आहे. जो ऑनलाइन बेटिंग महादेव ॲपचा भागीदार आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक बेटिंग आयडी सक्रिय आहेत. तो पाटण शहरातील यश सोसायटी राहत असून त्याच्या गाडीतून बाहेरगावी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळं सायबर क्राईम स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या पथकानं विशेष नजर ठेवून आरोपी भरत चौधरी याला अटक केली.
मोबाईलमध्ये बेटिंगसाठी 23 आयडी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत भरत चौधरीच्या फोनमध्ये बेटिंगसाठी 23 आयडी असल्याचं समोर आलं. तर महादेव ॲपच्या वार्षिक उलाढालीच्या खात्यातून एकूण 5200 कोटी रुपयांची रक्कम उघडकीस आली. एका व्हॉट्सॲप ग्रुपमुळं पोलिसांना ही माहिती मिळाली. सायबर टीम आरोपींची चौकशी करत आहे. तपासादरम्यान अलेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
15,30,000 रुपयांचा माल जप्त :अटक आरोपींनी त्याच्यासह अन्य आरोपींची नावेही साथीदार म्हणून उघड केली. सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी पाटण शहरातील बी डिव्हिजन पोलीस ठाण्यात क्रिकेट बेटिंगचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय भुज सायबर सेलने भरत चौधरीकडून 15,30,000 रुपयांचा मालही जप्त केला आहे. आरोपी भरत चौधरीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.