नवी दिल्ली : एका नेत्याच्या कथित हत्या प्रकरणावरुन कॅनडानं भारतावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत भारतानं कॅनडाला सडेतोड उत्तर दिलं होतं. तरीही कॅनडा वारंवार भारताविरोधात आग ओकत आहे. याला जशासतसे उत्तर भारतानं वेळोवेळी दिले आहे. आता एक मोठा निर्णय भारतानं घेतलाय.
कॅनडावर विश्वास नाही : भारत सरकारनं कॅनडातील उच्चायुक्त आणि तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या देशात परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. "अंतरवाद आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडातील ट्रुडो सरकारच्या कृतींमुळं आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली हे अधोरेखित झालं. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आमचा विश्वास नाही. त्यामुळं कॅनडातील उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे," अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली.
भारताचा मोठा निर्णय : भारत सरकारनं दहशतवादी घोषित केलेला खलिस्तानवादी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सोमवारी भारतातील कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. या बैठकीनंतर भारतानं कॅनडातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला.