पाटणा : आपल्या अनोख्या कहाण्यांनी बिहार कायम देशभरात चर्चेत राहते. आताही बिहारमध्ये एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. ड्युटी संपल्यानं चक्क रेल्वेचे लोको पायलट अन् गार्डनं रेल्वे साखळदंडानं ट्रॅकला बांधून ठेवली. इतक्यावरच हे पठ्ठे थांबले नाहीत, तर त्यांनी रेल्वे ट्रॅकवर बांधून घरी पोबारा केला. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना दुसऱ्या प्लॅटफार्मवर लावाव्या लागल्या. ही घटना बिहारमधील भागलपूर पाटणा रेल्वे मार्गावरील बाढ रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेनं रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रशासनानं आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
स्थानकावर साखळदंडानं बांधली रेल्वे : बिहारमधील भागलपूर-पाटणा रेल्वे मार्गावरील बाढ रेल्वे स्थानक सध्या देशभर चर्चेत आलं आहे. या स्थानकावर लोको पायलट आणि गार्डनं मालगाडी चक्क साखळदंडानं ट्रॅकवर बांधून ठेवली. आपली आठ तासांची ड्युटी पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी मालगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी केली. दोघंही रेल्वेला साखळदंडांनी बांधून घरी निघून गेले.
चोरी करू नये म्हणून सुरक्षेसाठी बांधली रेल्वे : बाढ रेल्वे स्थानकावर ही मालगाडी शनिवारी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली. मालगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचल्यानंतर चालक आणि गार्डनं ट्रेन थांबवली. त्यानंतर तिला साखळदंडानं बाधून हे दोगंही तिथून निघून गेले. याबाबत या रेल्वे कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेला साखळ्यांनी बांधण्यात आलं.