कानपूर (उत्तर प्रदेश) Two youths arrested : कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री उशिरा एका तरुणानं रेस्टॉरंट चालकाच्या घराबाहेर पार्किंगमध्ये उभ्या असलेली कार पेटवून दिली. घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. यानंतर मंगळवारी पोलिसांच्या पथकानं आणि ऑपरेशन त्रिनेत्राच्या मदतीनं ही घटना घडवून आणणाऱ्या दोन आरोपींना अटक केलीय.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण दोन तरुणांच्या प्रेमप्रकरणांशी संबंधित असल्याचं समोर आलंय. एका तरुणानं 50 लाख रुपये खर्च करुन त्याचं लिंग बदललं होतं. मात्र, त्याला मित्रानं लग्नास नकार दिला. त्यामुळे त्यानं कार पेटविली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक पैलूचा गांभीर्यानं तपास करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चकेरी पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामनगर इथं राहणाऱ्या तरुणाची इंदौरमधील तरुणाशी इंस्टाग्रामवरुन मैत्री झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू राहिला. त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. या तरुणानं 2022 मध्ये त्याचं लिंग बदललं होतं. दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यावर श्यामनगर इथं राहणाऱ्या तरुणानं लग्नास नकार दिला. याचा बदला घेण्यासाठी तरुणानं त्याच्या मित्रासह कार आणि घराला आग लावण्याचा कट रचला होता. ही घटना घडवण्यासाठी दोघांनी स्कूटी भाड्यानं घेतली. त्यात पेट्रोल भरुन इंदौरच्या तरुणाचं घर गाठलं. त्यांनी आधी पाईपच्या साहाय्यानं कारवर पेट्रोल सोडलं. त्यानंतर तरुणाच्या मित्रानं त्याच्या उभ्या असलेल्या कारवर पेट्रोल टाकून फिल्मी स्टाईलनं पेटवून दिली. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी मंगळवारी दोन्ही आरोपींना अटक केलीय.