नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. राज्यापासून ते दिल्लीपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. राज्यातील निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत राज्यातील जनतेचे आभार मानले. कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. जगातील कोणतीही ताकद कलम 370 परत आणू शकत नाही, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीवर केला हल्लाबोल : "महाराष्ट्रात घराणेशाहीची हार झाली आहे. राज्यात सत्याचा, सुशासनचा विजय झाला. मी राज्यातील मतदारांना, युवकांना, विशेष करुन महिलांना, शेतकऱयांना नमन करतो. तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दाखवून दिलं," असं म्हणत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
तिसऱ्यांदा मतदारांनी महायुतीला मतदान केलं : "मागील 50 वर्षातला राज्यातील हा सर्वात मोठा विजय आहे. भाजपाच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा मतदारांनी महायुतीला मतदान केलं. भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनलाय आणि हे ऐतिहासिक आहे. राज्यातील जनता ही भाजपा आणि महायुतीवर प्रेम करते हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य आहे, ज्यात लगातार भाजपाला तिसऱ्यांदा विजय मिळवता आला. एकट्या भाजपाला काँग्रेस आणि मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. लगातार तिसऱयांदा स्थिर सरकार दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
'एक है तो सेफ है' हा देशाचा महामंत्र : पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी पुन्हा एकदा 'एक है तो सेफ है'चा नारा दिला. 'एक है तो सेफ है' हा देशाचा महामंत्र बनला आहे. आरक्षण, संविधानाच्या नावावर खोटं बोलून एससी, एसटी, ओबीसींना वाटण्याचा प्लॅन काँग्रेसचा होता. तो डाव राज्यातील जनतेनं उधळूनलावत 'एक है तो सैफ है' चा नारा दिला. जाती, धर्म, भाषा आणि क्षेत्रच्या नावावर राजकारण करणाऱयांना जनतेनं धडा शिकवला. समाजातील सर्वच घटकानं भाजपाला मत दिलं. समाजाला वाटणाऱयांना मोठी चपराक दिली," असं म्हणत खोटा प्रचार करणाऱया काँग्रेसवर टीका केली.
मातृभाषेचा सन्मान : "माझ्या आणि भाजपासाठी छत्रपती शिवाजी महाराज है आराध्य पुरुष आहेत. मराठी भाषेच्या प्रति आमचं प्रेम दिसलं. काँगेसनं मराठी भाषेसाठी काहीच केलं नाही. भाजपानं मातृभाषेचा सन्मान केला. मातृभाषेचा सन्मान म्हणजे आपल्या आईचा सन्मान आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचं आम्ही रक्षण करत आहोत," असंही मोदी म्हणाले.
काँगेसनं सत्तेसाठी भांडणं लावली : "तुष्टीकरणासाठी काँग्रेसनं वक्फ बोर्डची स्थापना केली होती. काँगेसनं सत्तेसाठी जातीत भांडणं लावली. सत्तेच्या भुकेपोटी काँग्रेसनं त्यांचाच पक्ष खाल्ला आहे. काँग्रेसमधील जुने लोकं खरी काँग्रेस शोधत आहेत. त्यामुळं अंतर्गत वाद जास्त आहेत. एका परिवाराच्या हातात सत्ता असावी यासाठी त्यांनीच पक्ष संपवला आहे. सत्तेशिवाय काँग्रेस जगू शकत नाही. देशात राहून किंवा देशाबाहेर जाऊन भारतवर टीका केली जाते. अर्बन नक्षलवादपासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे," असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अर्बन नक्षलवादवरुन टीका केली.
हेही वाचा -