मुंबई : आज (23 नोव्हेंबर) 15 राज्यांच्या 48 विधानसभेच्या पोट निवडणुकीसह 2 लोकसभेच्या जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच या जागांसाठीही सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडं सर्वांच्या नजरा लागल्या असून वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकालही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख सामना हा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये झाला होता. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेकाप, समाजवादी पक्ष, माकप, भाकप या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह आरपीआय, जनसुराज्य पक्ष यांचा समावेश आहे. मनसे आणि वंचितनं देखील निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. याशिवाय संभाजीराजे छत्रपती यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं आघाडी स्थापन करत यंदा निवडणूक लढवली. मतदानानंतर दोन्ही प्रमुख आघाड्यांनी विजयाचा दावा केलाय.
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघ हा भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी विश्वासार्हतेचा प्रश्न बनलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये या भागात पक्षाचा दारुण पराभव झाल्यानं भाजपासमोरील आव्हानं आणखी खडतर झाली आहेत. दिवंगत खासदार वसंतराव यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसनं तिकीट दिलंय. तर भाजपानं डॉ. संतुक हुंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. संतुक यांचे बंधू मोहन हंबर्डे हे नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार असून यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत. ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. नांदेड हा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये चव्हाण यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. पण चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर येथील काँग्रेसची स्थिती बिकट मानली जात होती. मात्र, वसंतरावांच्या विजयानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चव्हाण यांची कन्या श्रीजयाही महाराष्ट्राच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून राजकीय इनिंग सुरू करत आहे. ही जागा नांदेड लोकसभेतही येते. त्यामुळंच या निवडणुकीत अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळतंय.
वायनाड लोकसभा पोटनिवडणूक : काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. प्रियंका गांधी या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. प्रियंका यांच्यासमोर भाजपानं नव्या हरिदास यांना तिकीट दिलंय. त्या भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या कोझिकोड महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक आणि भाजपा नगरसेवक पक्षाच्या नेत्या देखील आहेत.
झारखंडमध्ये कुणाची सत्ता येणार? : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. यामध्ये पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. तर दुसऱ्या टप्प्यातील 38 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. यानंतर आज (23 नोव्हेंबर) झारखंड विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं या निकालाकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर तेथील एक्झिट पोल समोर आले. 'पीपल्स पल्स' एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येऊ शकते. तर राज्यात 'इंडिया' 42-48 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 'मॅट्रीस' एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये भाजपा सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवला आहे. एकूण 81 विधानसभा जागांपैकी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना 42 ते 47 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 25 ते 30 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर 1 ते 4 जागा इतरांना मिळू शकतात. त्यामुळं झारखंडची जनता कोणाच्या बाजुनं कौल देते? या प्रश्नाचं उत्तर आता निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा -