नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे. मात्र लोकसभेचं पहिलं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 26 जून रोजी होणाऱ्या सभापती निवडीवरुन विरोधक एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. NEET-UG आणि UGC-NET मधील पेपरफुटी, सभापती नियुक्तीवरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवीन खासदारांचा शपथविधी :लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र नवीन खासदारांचा शपथविधी अद्याप बाकी आहे. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात त्यांना शपथ देण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ देणार आहेत. त्यानंतर भर्तृहरी महताब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे नेते यांना सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.