नवी दिल्ली :दिल्लीत जपानी एन्सेफलायटीसचा पहिला रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं (एमसीडी) सगळ्या जिल्हा आरोग्य अधिकारी आणि साथरोग विशेषज्ञांना या आजाराबाबत अलर्ट केलं आहे. जपानी एन्सेफलायटीसचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच डास नियंत्रणासाठी पावलं उचलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दिल्लीत आढळला जपानी एन्सेफलायटीसचा पहिला रुग्ण :जपानी एन्सेफलायटीस या तापानं पहिला रुग्ण आढळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही पीडित व्यक्ती दिल्लीच्या पश्चिम विभागातील बिदापूरमधील रहिवाशी आहे. दिल्ली महापालिकेनं पीडित रुग्णाच्या घराजवळील नागरिकांचीही तपासणी केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीअंती रुग्ण मूळचा नेपाळचा असल्याचं समोर आलं. नुकताच ही रुग्ण महिला नेपाळहून उत्तर प्रदेशमार्गानं भारतात परतली. मात्र परत येताच ही महिला आजारी पडल्यानंतर या महिलेला जपानी एन्सेफलायटीस असल्याचं उघड झालं. उपचारानंतर महिला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एन्सेफलायटीसचे रुग्ण :उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यात जपानी एन्सेफलायटीसचे रुग्ण असल्याची माहिती पुढं आली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात या आजाराची रुग्ण आढळतात. गेल्या वर्षीही एलएनजेपी रुग्णालयात तीन रुग्णांना दाखल करण्यात आलं. मात्र यावेळी जपानी एन्सेफलायटीस या विषाणूचा संसर्ग दिल्लीपर्यंत पोहोचला. या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी मच्छरदाणी वापरणं चांगलं असल्याचं तज्ज्ञ डॉक्टरांचं मत आहे. हा संसर्ग पसरवणारा क्युलेक्स डास रात्री चावत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याबाबत बोलताना सफदरजंग हॉस्पिटलच्या कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख जुगल किशोर म्हणाले की, जपानी एन्सेफलायटीस विषाणू उत्तर प्रदेश आणि बिहार आढळून येतो. रुग्णाच्या प्रवासामुळे या आजाराचा संसर्ग दिल्लीपर्यंत पसरला. हा संसर्ग डासांमुळे पसरला, असंही त्यांनी नमूद केलं.