चंदीगड Farmers Protest 2024 : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या आंदोलनात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन शेतकऱ्यांचा तर दोन पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांनी पुन्हा जेसीबी, क्रेनची मागणी केली आहे. शेतकरी पुन्हा मोठ्या जोमानं दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं आज शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलाच राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांनी ठोकला शंभू सीमेवर तळ :शेतकरी नेत्यांनी राजधानी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुरांची नळकांडे फोडली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी काही वेळ रस्ता खाली केला. मात्र या शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर तळ ठोकला आहे. आज सकाळी शेतकरी पुन्हा दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणार आहेत. पंजाब हरियाणाच्या सीमेवर असलेल्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा ताफा आज सकाळी 11 वाजता शेतकरी दिल्लीकडं कूच करणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यासह खनुरी सीमेवरुनही शेतकरी हरियाणात दाखल होणार आहेत. तेथून ते ट्रॅक्टरनं दिल्लीकडं कूच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.