नवी दिल्ली Farmers Protest 10th Day : बुधवारी हरियाणातील जिंदजवळील खनौरी सीमेवर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) नं आज हरियाणात दोन तासांच्या चक्का जामची घोषणा केलीय. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी व्हिडिओद्वारे या निर्णयाची माहिती दिलीय. तसंच 23 फेब्रुवारीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
आज हरियाणात चक्का जाम : पंजाब-हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आणि हरियाणा पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे. शंभू बॉर्डर आणि खनौरी सीमेवरील परिस्थिती अत्यंत बिकट झालीय. बुधवारी पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील 22 वर्षीय तरुणाचा खनौरी सीमेवर मृत्यू झाल्याचा दावा करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियन (चढूनी गट) आज दुपारी 12 ते 2 या वेळेत हरियाणात चक्का जाम आंदोलन करणार आहे.
काय म्हणाले बीकेयूचे अध्यक्ष : बीकेयूचे अध्यक्ष गुरनाम सिंग चढूनी यांनी आपल्या व्हिडिओत म्हटलंय की, "तरुणाच्या मृत्यूच्या घटनेनं सर्वांना धक्का बसलाय. संघटनेनं 22 फेब्रुवारीला हरियाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याची घोषणा केली होती. मात्र आता तो रद्द करुन तरुणाच्या मृत्यूच्या विरोधात संपूर्ण हरियाणात 2 तास रास्ता रोको करणार आहोत. या चक्का जाममध्ये बीकेयूचे लोक आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. तसंच 23 फेब्रुवारीला बीकेयू पुन्हा एकदा आपल्या संघटनेच्या अधिकाऱ्यांशी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करुन शेतकरी आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेणार आहे."