हैदराबाद: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड कदाचित कोणी विसरलं असेल असं नाही. एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. या हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. आता अशाच प्रकारची आणखी एक त्याहून अधिक क्रौर्य दाखवणारी घटना हैदराबादमध्ये घडली आहे. एका पतीनं आपल्या पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते कुकरमध्ये शिजवून तलावात टाकल्याची घटना रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट येथे घडली आहे. गुरुमूर्ती असं आरोपी पतीचं नाव आहे.
मृत महिलेचं १३ वर्षांपूर्वी झालं होतं लग्न : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हैदराबादच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरपेट भागात घडली आहे. या हत्येतील आरोपी पती हा निवृत्त लष्करी जवान आहे. निवृत्ती घेतल्यानंतर आरोपी डीआरडीओमध्ये आउटसोर्स्ड सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. त्याचं आणि मृत महिलेचं १३ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान आरोपीने १५ जानेवारी रोजी पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तिची हत्या केली आणि १६ जानेवारीला मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी ही धक्कदायक घटना उघडकीस आली.
कुकरमध्ये शिवजवले मृतदेहाचे तुकडे: या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी आरोपीची चौकशी केली असता, त्यानं सांगितलं, “आम्हा दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. १५ जानेवारी रोजीही आमच्यात भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात पत्नी माधवीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले आणि तलावात फेकले.”
काय आहे घटना? :मृत महिलेच्या पालकांनी १३ जानेवारीला मीरपेट पोलीस ठाण्यात माधवी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. आरोपी गुरुमूर्ती हा डीआरडीओमध्ये आउटसोर्स सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तो त्याची पत्नी व्यंकट माधवी (३५) आणि त्यांच्या दोन मुलांसोबत न्यू व्यंकटेश्वरा नगर कॉलनी, जिलेलागुडा येथे राहात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यंकटा माधवी या बेपत्ता होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी गुरुमूर्तीने त्याला या घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचं भासवलं आणि चौकशीसाठी सासरच्या मंडळींसह पोलीस ठाण्यात गेला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना कळालं की गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्याआधारे चौकशीसाठी गुरुमूर्तीला ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीदरम्यान गुन्ह्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्याने पत्नी व्यंकटा माधवीची हत्या केल्याचं कबुल केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -
- दुहेरी हत्याकांडाने बीड हादरलं! दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्या,आठ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- बीपीओ अकाउंटंटकडून कंपनीच्या पार्किंगमध्येच महिला सहकाऱ्याची हत्या, हत्येचं कारण काय?
- पाण्याचा हंडा डोक्यात घालून दारूड्या मुलानं केली आईची हत्या