श्रीनगर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील कादर बेहिबाग भागात मध्यरात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक उडाली. अद्यापही या भागात चकमक सुरुच असून 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावर भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस जवान तळ ठोकून आहेत. जवानांकडून दहशतवाद्यांचा अद्यापही शोध सुरू आहे.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक :सुरक्षा दलाच्या उच्च अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोधमोहीम राबवली. संयुक्त पथक दहशतवादी लपलेल्या ठिकाणावर जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे सैन्य दलाच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मध्यरात्री कादर बेहिबाग इथं ही चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. या परिसरात अनेक दहशतवादी लपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.