नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. निवडणूक आयोगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या विधानांवर आक्षेप घेतलाय. दोघांनीही आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे. निवडणूक आयोगानं भाजपा, काँग्रेसला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.
भाजपासह काँग्रेसला उत्तर दाखर करण्याचे आदेश : भाजपा तसंच काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समुदाय तसंच भाषेच्या आधारावर समाजात फूट निर्माण केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात दोन्ही पक्षांना 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 77 अंतर्गत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना जाब विचारला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पीएम मोदींवर, तर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगानं म्हटलंय की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या नेत्यांच्या भाषणांचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आयोगाच्या नोटिशीवर काँग्रेसची प्रतिक्रिया : निवडणूक आयोगानं काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसवर जयराम रमेश म्हणाले की, "आम्ही आयोगाकडं तक्रार केली होती. भाजपा धर्माचा निवडणूक प्रचारात दुरुपयोग करत आहे. हे खूप चिंताजनक आहे. आम्ही या नोटीसला उत्तर देऊ."