नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकची रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी दिल्ली निवडणूक 2025 ची तारीख जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज पत्रकार परिषद घेतली. दिल्लीतील विधानसभा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यापूर्वी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. दिल्लीत एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका (Delhi Election 2025) होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
दिल्ली निवडणूक २०२५ चे वेळापत्रक (ANI) 5 फेब्रुवारी रोजी होणार मतदान: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (7 जानेवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राजधानी नवी दिल्लीचा पुढील पाच वर्ष कारभार कोणाच्या हाती असणार याचा फैसला 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. यासह दिल्लीत आचारसहिंता लागू झाली आहे. दिल्ली विधानसभेची मुदत 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.
ईव्हीएमच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील आज निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली. ईव्हीएम हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच सायंकाळी सहानंतर अचानक मतदान वाढलं कसं असा प्रश्नही महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात येत होता. या प्रश्नाला देखील या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिलंय. सायंकाळी साडेसहाला जो आकडा जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये मतदानाची पूर्ण टक्केवारी सांगता येणं अवघड असतं, मात्र फायनल टक्केवारी ही रात्री आकराच्या सुमारास येते असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 : निवडणूक आयोग थोड्याच वेळात करणार निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर
- दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? संभाव्य उमेदवारांबद्दल जाणून घ्या सर्वकाही
- भाजपा लोकशाहीच्या मुळावर उठलेला पक्ष; अरविंद केजरीवालांना देशद्रोही ठरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न चुकीचा, संजय राऊतांचा हल्लाबोल