नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात घवघवित यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन घोडं अडलं आहे. त्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून मुख्यमंत्री पदाची घोषणा मुंबईत केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र या बैठकीत सगळ्यांचे आनंदी चेहरे असताना काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर मात्र चांगलीच काळजी दिसल्यानं याबाबत मोठे तर्कवितर्क काढले जात आहेत.
दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली :महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची दिल्लीत गुरुवारी रात्री बैठक पार पडली. त्यानंतर अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संयुक्तपणे बैठक घेतली. या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली. अमित शाह यांच्यासोबत झालेली आमची बैठक सकारात्मक झाली. आता पुढील कालावधीत महायुतीची एक बैठक मुंबईत होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.