जम्मू Doda Encounter :जम्मू काश्मीमधील दोडा जिल्ह्यातील देसा इथल्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या एका कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पुन्हा दोन वेळा गोळीबार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या चकमकीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. बुधवारी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती भारतीय सैन्य दलाच्या वतीनं देण्यात आली.
भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक :जम्मू काश्मीरमधील दोडा इथल्या देसा जंगलात भारतीय सैन्य दलातील कमांडो, जम्मू काश्मीर पोलिसांचं विशेष पथक आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकानं सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. देसा इथं सुरू असलेल्या कारवाईत बुधवारी दहशतवाद्यांनी रात्री 10.45 वाजता खलान भट्टाच्या जंगलात गोळीबार केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पहाटे 2 वाजता पंचान भाटावर गोळीबार सुरू केला, मात्र या गोळीबाराला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.