मुंबई Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलीय. या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यात पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी चर्चा झाली.
जागावाटप फायनल? : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असतील. हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात यावा अशी चर्चा झाली, तर या बदल्यात काँग्रेसकडे असलेला सांगली मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात यावा याबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
चंद्रहार पाटील मातोश्रीवर : सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाणार हे स्पष्ट होत असल्याने, या जागेवरून इच्छूक असलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराजांनी उभं राहावं यासाठी शरद पवार यांनी त्यांना आग्रह केला होता. त्यानुसार महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आपण लढावं. मात्र, ही निवडणूक लढवावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी शाहू महाराज यांच्या निवडणुकीची जबाबदारी घेतली असून, त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, असं म्हटले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांनीही याबाबत अनुकूलता दाखवल्यामुळे आता कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्चित मानलं जातं आहे.
महाराजांनी मशालीवर निवडणूक लढवावी : कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र, स्थानिक राजकीय गणितं आणि मालोजीराजे यांच्या भविष्यासाठी शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार आता कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात येईल, तर त्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. हातकणंगले हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे कायम राखला आहे. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, त्यांनी जर ही उमेदवारी नाकारली. तर त्या जागेवरून जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सुरू आहेत.