नवी दिल्ली : काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं. विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अमृता फडणवीस ट्रोल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "विरोधकांनी माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर वैयक्तिक हल्ले करण्यास सुरुवात केली. कारण, त्यांना माझा पराभव करणे शक्य होणार नसल्याचं कळालंय. काँग्रेसच्या ट्रोल आर्मीकडून माझ्या पत्नीवर तिने बनवलेल्या इंस्टाग्राम रील्सवरून आरोप करण्यास सुरुवात केली. मात्र, शेवटी सत्याचा विजय होईल, असा विश्वास आहे."
देवेंद्र फडणवीस संतप्त : सोशल मीडियातून पत्नी अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, "माझ्या पत्नीवर करण्यात येणारी टीका आणि अपमानास्पद लिखाण पाहता ट्रोल करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी माझ्या पत्नीबद्दल मीम्स बनवले. तिच्याबद्दल अनेक वाईट गोष्टी लिहिल्या आहेत. तुम्हाला लढायचं असेल तर समोर येऊन लढा. मी खूप संयमी आहे. मी त्यांना पराभूत करेन."
माझ्या पत्नीला केलेले ट्रोल कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीनं पाहिले तर त्यांना खूप लाज वाटेल. मी माझ्या पत्नीला सांगितलं की, आपण राजकारणात आहोत. आपण संयम ठेवला पाहिजे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कन्हैया कुमार यांनी काय म्हटलं होतं? : नागपुरात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटलं, "जर धर्म वाचवण्याचा प्रश्न असेल, तुमची (भाजपा नेते आणि देवेंद्र फडणवीस) मुलं-मुलीही या लढ्यात आमची साथ देतील का? असा प्रश्न भाषण देण्याऱ्यांना विचारा. धर्म वाचवायचा असेल तर सर्वजण मिळून वाचवतील. आम्ही धर्म वाचवू आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी इन्स्टाग्रामवर रील काढत राहतील, असं तर होणार नाही ना?"
पक्ष फोडण्यात शरद पवार 'भीष्म पितामह' : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं टीका करण्यात येते. त्यावर विचारलं असता फडणवीस म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार हे राजकीय पक्ष आणि कुटुंबं फोडणारे 'भीष्म पितामह' आहेत. राजकारणात घराणे तोडण्यात, पक्ष तोडण्यात, एकत्र आणण्यात आणि त्यानंतर पुन्हा तोडण्यात शरद पवार हे मास्टर आहेत. 1978 पासून त्यांनी किती पक्ष आणि घराणे फोडली आहेत? याची यादी तयार केली तर त्यांना पक्ष आणि कुटुंबे तोडणारा 'भीष्म पितामह' म्हणावं लागेल."
शिवसेना, राष्ट्रवादी का फुटली? : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर फडणवीस म्हणाले, "अति महत्त्वाकांक्षेमुळं शिवसेना फुटली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यामुळं त्यांनी आमच्याशी (भाजपा) संबंध तोडले. आदित्य ठाकरेंना संधी देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्यायच उरला नव्हता. तर 30 वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवारांना व्हिलन ठरण्यात आलं. कारण सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं होतं."
हेही वाचा-
- 'बटेंगे तो कटेंगे' वरून महायुतीत बेबनाव: अजित पवारासंह अशोक चव्हाणांच्या नाराजीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
- प्रचार संपल्यावर पंतप्रधान मोदी विदेशात जाणार; संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले 'देवेंद्र फडणवीसांना काहीच माहिती नाही'
- साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, योगींची धडाडणार तोफ, प्रियांका गांधींच्या सभेसाठी काँग्रेसचा प्रयत्न