पुणे Puja Khedkar Grants Protection : केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांचा शोध घेण्यात येत आहे. पण आता या प्रकरणात पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक करू नका, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांना दिलासा मिळाला आहे.
अटकेपासून 21 ऑगस्टपर्यंत स्थगिती : बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा दिला. उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांच्या अटकेला 21 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठानं खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यूपीएससीला पक्षकार करा : पूजा खेडकर यांचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांना या प्रकरणात यूपीएससीला पक्षकार बनवण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालाने दिले. यानंतर लुथरा यांनी लवकरच अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. पटियाळा हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड रद्द :भारतीय प्रशासकीय सेवेतून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं उमेदवारी रद्द केल्यानं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका पूजा केडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी पूजा खेडकर यांना उच्च न्यायालयानं कॅटमध्ये जाण्यास सांगितलं. आता पूजा खेडकर यांचा शोध दिल्ली पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मात्र आज न्यायालयानं दिल्ली पोलिसांना निर्देश देत पूजा खेडकर यांना 21 ऑगस्टपर्यंत अटक करू नका, असे निर्देश दिले आहेत. यामुळे पूजा खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -पूजा खेडकर यांच्या वडिलांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल; दबाव पडला महागात - FIR On Pooja Khedkar Father