नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात 'आप'ला मोठा पराभव स्विकारावा लागला आहे. तर या निवडणुकीत भाजपाला मोठं यश आलं असून, आता भाजपा दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. या निकालानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
विरोधात बसून जनतेची कामं करणार : "जनतेनं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. विजयाबद्दल भाजपाला मी शुभेच्छा देतो. लोकांनी ठेवलेल्या अपेक्षा भाजपा पूर्ण करेल असा विश्वास आहे. जनतेनं मागील 10 वर्ष आम्हाला संधी दिली व त्यात आम्ही खूप चांगली कामं केली. शिक्षण, आरोग्य, वीज अशा विविध क्षेत्रात काम करत लोकांना दिलासा दिला. आता विरोधी बाकावर जरी आम्ही बसणार असलो तरी सुद्धा आम्ही जनतेची कामं करत राहणार आहोत. राजकारणात आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत, सत्तेसाठी नाही. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं व त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो," अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर दिली.