पश्चिम बंगाल(दार्जिलिंग) Kanchenjunga Express Accident :पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये सोमवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाताहून येणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तर 60 पेक्षा अधिकप्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. माहिती देताना उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, सोमवारी सकाळी सियालदहला जाणारी कांचनजंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीजवळ मालगाडीला धडकली. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
दार्जिलिंगमध्ये रेल्वे अपघात (File Photo) 60 पेक्षा अधिक प्रवासी जखमी : उत्तर रेल्वेच्या कटिहार विभागाचे रेल्वे व्यवस्थापक म्हणाले की, ''हा अपघात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात 60 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून येणारी कांचनजंगा एक्स्प्रेस नवीन जलपाईगुडी स्थानकाजवळ रंगपानी येथे मालगाडीला धडकली.''
दार्जिलिंगमध्ये अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू (File Photo) रेल्वेमंत्री घटनास्थळी पोहचले :रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी तातडीने पश्चिम बंगाल जलपाईगुडी स्टेशनजवळ रंगापानी येथे घटनास्थळावर भेट देत पाहणी केली. मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने अपघातस्थळी जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना मोटारसायकलने जावं लागले.
ममता बॅनर्जी यांनी दिली माहिती : या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली आहे. "आत्ताच दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसिडवा भागात झालेल्या एका भीषण रेल्वे अपघाताबाबत मला धक्का बसला आहे. कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीशी टक्कर झाल्याचं वृत्त आहे. डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथकं उपस्थित आहेत. जखमींना बचाव आणि वैद्यकीय मदतीसाठी घटनास्थळी पाठवण्यात आले."
- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया :अपघातानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली की, एनएफआर झोनमध्ये हा दुर्दैवी अपघात होता. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
- रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी : अपघातानंतर रेल्वेनं हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जेणेकरून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना माहिती मिळू शकेल. अपघातामधील प्रवाशांचे नातेवाईक कटिहार विभागीय क्षेत्रातील लँडलाइन क्रमांक 033-23508794 आणि 033-23833326 या क्रमांकावर संपर्क करू शकतात.
हेही वाचा
- वाळवंटीकरण आणि दुष्काळाचं निर्मूलन कसं करायचं? आज 'हा' जागतिक दिवस केला जातोय साजरा - Combat Desertification and Drought
- NCERTच्या नव्या पुस्तकांतून बाबरी मशीद, गुजरात दंगल, हिंदुत्वाचे संदर्भ वगळले - NCERT books Changes
- रेल्वे मंत्रालयानं "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये मिळवलं स्थान; केला 'हा' मोठा विक्रम - Limca Book of Records