तिरुअनंतपुरम :फेंगल चक्रीवादळामुळे केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळमधील तब्बल चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राज्यभर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोट्टायम, इडुक्की, वायनाड, पठाणमथिट्टा आणि कन्नूर जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र, नियोजित परीक्षांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
केरळमधील चार जिल्ह्यात रेड अलर्ट :फेंगल चक्रीवादळामुळे देशभरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तिरुअनंतपुरम आणि कोल्लम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि वायनाड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. तर इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड आणि कासारगोड जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला. भारतीय हवामान विभागानं IMD पथनामथिट्टा, अलप्पुझा आणि कोट्टायमसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
सावधगिरी बाळगण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन :राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. शहरी आणि सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असं आवाहन त्यांनी केलं.