जयपूर (राजस्थान) :Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज बुधवार (दि. 14 फेब्रुवारी) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केला आहे. यादरम्यान काँग्रेसने सोनियांची उमेदवारी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं म्हटलं आहे. तसंच, आम्ही काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी मोठं काम करू. आमचं फक्त एकच लक्ष्य आहे ते म्हणजे, राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान करायचं आहे असा निर्धारही येथील माजी मंत्री गोविंद दोतासरा यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नेत्यांनी केलं स्वागत : सोनिया गांधी आज सकाळी जयपूर विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. यावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासरा, विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांचं स्वागत केलं.
प्रियंका गांधी उतरणार लोकसभेच्या रिंगणात : सोनिया गांधी या राज्यसभेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्या कोणत्या राज्यातून निवडणूक लढवतील याबद्दल स्पष्टता नव्हती. परंतु, आता ही चर्चा संपली असून सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता सोनिया गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली या लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा आहे.
मनमोहन सिंग यांची जागा रिक्त : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजस्थानमधून राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. मनमोहन सिंग यांनी यावेळी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पक्ष आता सोनिया गांधींना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवत आहे. सध्या सोनिया गांधी त्यांच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघ रायबरेली येथून खासदार आहेत. ही जागा रिक्त होईल. त्यानंतर यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी जोरदार चर्चा आहे.