आसाम (नागाव) : Rahul Gandhi prevented entering temple : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेता राहुल गांधी यांना आसाममध्ये वैष्णव संत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आलं. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तुम्ही मला कोणत्या कारणाने अडवत आहात? असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. परंतु, गांधी यांना मंदिरास जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यावर ''आज फक्त एकच व्यक्ती मंदिरात जाणार का?'' असा प्रश्न उपस्थित करत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. आज अयोध्या येथे रामरायाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. तेथे मंदिरात फक्त पंतप्रधान मोदीच असणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पूजा होत आहे. त्यावर राहुल गांधी यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
आज फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश : राहुल गांधी सध्या 'भारत जोडो न्याय यात्रे'वर आहेत. त्यांच्या नेतृत्वातील ही यात्रा सध्या आसाममध्ये आहे. तेथील मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने राहुल यांची यात्रा वेगळ्या मार्गावरून गेल्याचं सांगत अडवली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत अशी टीका केली होती. त्यानंतर हिंमत बिस्व सरमा सरकारने राहुल यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'त अडथळे आणण्यास सुरूवात केली, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. ही यात्रा सध्या आसामच्या नागाव जिल्ह्यात आहे. आसाममधील वैष्णव संत शंकरदेव यांचे जन्मस्थानही नागाव जिल्ह्यात आहे. त्या ठिकाणी आज राहुल गांधी चालले होते. तेव्हा त्यांना अडवण्यात आलं. दरम्यान, अगोदर परवानगी देण्यात आली होती. मात्र, पुन्हा ती नाकारण्यात आली.
स्थानिक आमदार खासदारांना प्रवेश : मी देवाच्या दरबारात फक्त हात जोडण्यासाठी जात आहे. का अडवलं जात आहे याचं कारण द्या, असा खुलासा राहुल यांनी विचारला. तसंच, यावेळी राहुल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. ''आज मंदिरात फक्त एकाच माणसाला जाण्याची परवानगी आहे का?'' यावेळी मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांचा पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी वादही झाला. अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना सांगितले की, आम्ही तुम्हाला दुपारी 3 नंतर जाऊ देऊ शकतो. त्यानंतर राहुल गांधी आपल्या समर्थकांसह मंदिरासमोरच बसले. तसंच, विशेष म्हणजे, स्थानिक खासदार आणि आमदारांना शंकरदेवाच्या मठात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राहुल गांधींना जाऊ दिलेले नाही.
सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' गुरूवारी आसाममध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी आसामच्या भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. देशातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आणि भ्रष्ट मुख्यमंत्री आसाममध्ये आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. याला मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ते भ्रष्टच नाही, तर डुप्लिकेट आहेत. त्यांच्या कुटुंबाचे नाव गांधी नाही असा घणाघात सरमा यांनी केला होता.