मुंबई : चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांच्यावर मुंबईत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार बेनेगल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. मुंबई पोलिसांनी तिरंग्यामध्ये लपेटलेला त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानाने नेला. मुंबई पोलिसांच्या बँड पथकाद्वारे यावेळी शोकधून वाजवण्यात आली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून बेनेगल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारापूर्वी बेनेगल यांचं पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये सुमारे तासभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कारासाठी दिग्गज उपस्थित : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, सचिन खेडेकर, गीतकार गुलजार, इला अरुण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, प्रल्हाद कक्कड, बोमन इराणी, हंसल मेहता, रत्ना पाठक शाह, दिव्या दत्ता, रणजित कपूर, विवान शहा ,कुणाल कपूर, नंदिता दास, श्रेयस तळपदे, कुलभूषण खरबंदा यांच्यासहित इतर कलाकारांनी यावेळी स्मशानभूमीत गर्दी केली होती.
बेनेगल यांच्या तत्वांवर वाटचाल करणं ही श्रध्दांजली - नंदिता दास : श्याम बेनेगल यांच्या शिकवणीवर, त्यांच्या तत्वांवर आचरण करणं हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, बेनेगल यांनी माणुसकीला नेहमीच महत्त्व दिलं. नवीन पिढीनं त्यांचे चित्रपट पाहून धडा शिकावा, असं नंदिता दास म्हणाल्या.
"श्याम बेनेगल यांच्यासोबत केलेल्या कामाचा अनुभव अत्यंत महत्वपूर्ण आणि संस्मरणीय आहे. त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी आणि त्यांच्यासोबत चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या व्यक्तीमत्वात फार फरक पडला. बेनेगल यांच्यासोबत काम करणं हा मोठा अनुभव होता. ते जणू चित्रपटसृष्टीचे विश्वकोष होते. त्यांनी नेहमीच कलाकारांचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यांना सन्मानाने वागवलं". - श्रेयस तळपदे, अभिनेता
"श्याम बेनेगल यांच्यासोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. बेनेगल यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे,". - बोमन इराणी, अभिनेता
बेनेगल यांच्यापासून शिकण्याची गरज - जावेद अख्तर : श्याम बेनेगल हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज होते. त्यांच्यापासून सर्वांनी शिकण्याची गरज आहे. 1974 ला म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी बेनेगल यांनी अंकुर चित्रपट बनवला होता. तेव्हापासून समांतर चित्रपटाला त्यांनी नवीन वेगळी ओळख मिळवून दिली. वास्तववादी चित्रपटाला महत्त्वाचं स्थान त्यांनी चित्रपट सृष्टीत मिळवून दिलं. त्यांच्या चित्रपटासाठी गीत लिहिण्याची मला संधी मिळाली, त्यामुळं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. जगातील सर्वोत्कृष्ट 100 दिग्दर्शकांमध्ये सत्यजित रे आणि श्याम बेनेगल यांचा समावेश झाला हे देशासाठी गौरवास्पद आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा -