नवी दिल्ली : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून (MVA) ईव्हीएमवर आक्षेप घेत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच सोलापूरमधील माळशिरसमधील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याला प्रशासनाकडून विरोध करण्यात आला. या घटनेनंतर रविवारी (8 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार मारकडवाडीत आले होते. पवारांच्या पाठोपाठ आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आज (9 डिसेंबर) मारकडवाडीत मविआच्या ईव्हीएमविरोधातील आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव सध्या प्रसिद्धीच्या झोतात आलंय. इथून ईव्हीएमद्वारे निवडणूक जिंकलेले राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) स्थानिक आमदार उत्तमराव जानकर यांनी राजीनामा देऊन पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळं हा मुद्दा अजूनच पेटून उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल गांधी काढणार लॉंग मार्च? : यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणसिंग सप्रा म्हणाले की, "महाविकास आघाडीकडून राज्यभरात ईव्हीएमच्या विरोधात तीव्र निषेध केला जाईल. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींना 9 डिसेंबर रोजी मारकवाडी येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय." राहुल गांधी आज गावात ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याची शक्यता आहे.