नवी दिल्ली Citizenship Amendment Act : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू केला आहे. या कायद्यानुसार भारताच्या शेजारी असलेल्या देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी भारत सरकारनं यासाठी एक वेब पोर्टलही तयार केलं आहे. त्यावर अर्ज करुन नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकते. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर देशभरात तगडी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. दुसरीकडं भाजपा नेत्यांनी या कायद्याचं स्वागत केलं आहे. तर काँग्रेस पक्षानं आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा लागू केल्यानं त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विरोधकांनी सीएएचा कायम विरोध केला :ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी हरियाणाचे शिक्षण मंत्री कंवर पाल गुर्जर यांच्याशी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) बाबत खास बातचीत केली. "आपण नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) चं स्वागत करतो. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर खूप आनंदी आहे," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "देशाची फाळणी झाली तेव्हा तिथं राहिलेल्या नागरिकांना तिथंच ठेवण्यात हे नेते जबाबदार होते. त्यामुळं पुढच्या काळात या नागरिकांची भारत काळजी घेईल, असं नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र अशा अल्पसंख्यांक नागरिकांची दखल घेण्यात आली नाही. शेजारच्या देशात जे पूर्वी 23 टक्के होते, ते आता 2 टक्क्यांवर आले. त्यामुळे या नागरिकांना भारतात येऊन जीव वाचवायचा असेल, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी भारताची आहे. काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केले होते, मात्र इतर विरोधी पक्षांनी विरोध केला."