मुंबई - Chhatrapati Sambhaji Maharaj : मध्ययुगीन भारतातही एक असा मराठा योद्धा झाला ज्याच्या बलिदानानं मुघल काळातील सर्वात क्रूर शासक औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं होतं. 'स्वराज्यनिर्माता' छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप काही लिहिलं आणि वाचलं गेलं. पण इतिहासकारांनी त्यांचा मुलगा 'स्वराज्यरक्षक' छत्रपती संभाजी महाराजांना जो न्याय द्यायला हवा होता तो दिलेला नाही. त्यांच्याबद्दल खूप कमी गोष्टी इतिहासामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 जून 1657 रोजी पुरंदर येथील किल्ल्यावर झाला होता. आज फाल्गुन अमावस्या 8 एप्रिल हा दिवस आहे. तिथीनुसार छत्रपती संभाजी राजेंची आज पुण्यतिथी आहे.
संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप सुटले :आपण खूप थाटामाटात हिंदू नववर्षाचं स्वागत करतो. पण ज्यांनी हिंदूचं रक्षण केलं अशा छत्रपती संभाजी महाराजांचे क्वचितच स्मरण करत असू. चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही न डगमगता हिंदवी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज अनेक भाषांचे विद्वान पंडित आणि कवी होते. त्यांनी बुधभूषणम्, नायिकाभेद, सत्शतक आणि नखशिकांत यांसारख्या संस्कृत ग्रंथांचीही रचना केली होती. शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र असलेल्या संभाजी राजे यांना फार कमी वयात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला होता. 2 वर्षांचे असताना आईच्या मायेची छत्र-छाया हरवल्यानंतर जिजाऊंनी संभाजीराजेंना घडवलं. फार कमी वयात संभाजी राजे वडिलांबरोबर आग्र्याला गेले होते. यानंतर त्यांना औरंगजेबानं कैद केलं होतं. यानंतर आग्रा येथून शिताफीनं सुटका करून घेऊन शिवाजीराजे राजधानीत परतले होते. तसेच याकाळात सुरक्षिततेसाठी संभाजी राजांना काही दिवसांसाठी मथुरेत ठेवण्यात आलं होतं. यानंतर संभाजी राजे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी मथुरेमधून औरंगजेबाच्या सैन्य पहाऱ्याला चकवा देऊन सुखरुपपणे 1666-67 रोजी रायगड किल्ल्यावर पोहोचले होते.
संभाजी महाराजांचा मृत्यू :रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर औरंगजेबानं रायगडावर हल्ला केला. या लढाईमध्ये संभाजी राजे विजयी झाले. यानंतर अनेकदा औरंगजेबाच्या सैनिकांनी मराठा साम्राज्यावर हल्ला केला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे राजकीय करणासाठी संगमेश्वरातून रायगडावर परत जात होते. यावेळीच औरंगजेबाच्या कारस्थानी सैनिकांनी अचानक हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतलं. संभाजीराजांना अटक केल्यानंतर औरंगजेबानं त्यांच्यावर खूप अत्याचार केले. छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबानं धर्म परिवर्तन करण्यासही सांगितलं, मात्र त्यांनी यासाठी नकार दिला. त्यानंतर महाराजांची जीभ कापली, डोळे काढले, संपूर्ण शरीर सोलून काढलं. चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर स्वराज्याची तेजस्वी प्राणज्योत मालवली. तो दुर्दैवी दिवस होता फाल्गुन अमावस्येचा. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाचे तुकडे करून तुळापूरच्या नदीत फेकण्यात आले. औरंगजेबाच्या क्रूर सैनिकांची मोठी दहशत असतानाही काही स्थानिक लोकांनी महाराजांचं पार्थिव शरीर ओळखलं. यानंतर त्या लोकांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करून त्याला शिवलं आणि त्यांच्यावर हिंदू पध्दतीनं अंत्यसंस्कार केला.
संभाजी महाराजांचा मृत्यू तारखेनुसार 11 मार्च 1689 रोजी झाला होता. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर आधी छत्रपती राजाराम महाराज आणि नंतर महाराणी ताराबाईंनी स्वराज्याचा ध्वज फडकत ठेवला. तरण्याबांड मराठा मुलांनी, अनुभवी मावळ्यांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यासह मुघल साम्राज्याला पुन्हा एका हादरा दिला. दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेला औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झाला नाही. तो वयाच्या 90 व्या वर्षी याच मातीत दफन झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर शंभर वर्षांहून अधिक काळ मराठेशाहीचा डौल कायम राहिला. याचं छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या नरसिंहाप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज नावाच्या सिंहाच्या 'छावा'लाही द्यावंच लागेल. शिवाजीराजेंनी जगावं कसं हे शिकवलं. तर संभाजीराजेंनी देश आणि स्वराज्य धर्मासाठी मरणाला कवटाळत अनोखा आदर्श निर्माण केला. आजच्या या दिवशी छत्रपती संभाजी राजेंच्या अद्वितीय शौर्याचं, पराक्रमाचं, ज्वलंत आदर्शाचं, बलिदानाचं स्मरण करु या.
हेही वाचा :
- मराठी कलावंतांचा गुढीपाडवा 'चिरायू'; 17 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम - GUDIPADwA 2024
- का साजरा केला जातो राष्ट्रीय सागरी दिन; जाणून घ्या काय आहे इतिहास - National Maritime Day 2024
- जागतिक मालवणी भाषा दिन : मराठी भाषेचं वैभव समृद्ध करणारी 'मालवणी' भाषा - Malvani Language Day