नवी दिल्ली : Sugarcane Rate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज बुधवार (दि. 21 फेब्रुवारी)रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊस खरेदीच्या दरात आठ टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ऊस खरेदीचा दर प्रतिक्विंटल 315 वरून 340 रुपये करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. चालू हंगामाच्या 2023-24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा सुमारे 8% जास्त असलेली उसाची ही किंमत आहे. सुधारित एफआरपी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
महत्वाचे निर्णय घेतले : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, " मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. 2014 पूर्वी खत मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत होते. त्यावेळी उसाचा भाव रास्त नव्हता. दोन वर्षे वाट पाहावी लागली. मात्र मोदी सरकारने या दिशेने उत्कृष्ट काम केलं आहे. तसंच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 2019-20 मध्ये 75,854 कोटी रुपये मिळाले आहेत. 2020-21 मध्ये 93,011 कोटी रुपये मिळाले आहेत. 2021-22 मध्ये शेतकऱ्यांना 1.28 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. त्याचवेळी, 2022-23 मध्ये 1.95 लाख कोटी रुपये मिळाले. हे पैसे थेट त्यांच्या खात्यात पाठवले गेले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असंही ते म्हणाले.
मागील वर्षी 315 रुपये : यावर बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, शेतकऱ्यांना उसाची वाजवी किंमत मिळावी यासाठी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत आगामी उसाच्या हंगामासाठी किंमत निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखर कारखानदारांनी (2024-25) या वर्षासाठी 340 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.