नवी दिल्ली :BJP National Convention : "मागील दहा वर्षांत भारतानं गतीने प्रगती केलीय. ही गोष्ट फक्त मी सांगत नाही तर पूर्ण जग गाजावाजा करुन सांगत आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. या विकासाच्या प्रत्येक संकल्पात एक भारतीय जोडला गेला आहे. आपला देश छोटी स्वप्न पाहू शकत नाही. संकल्पही छोटे करु शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विकासाचा आलेख मांडला. ते आज रविवार (दि. 18 फेब्रुवारी)रोजी दिल्लीत आयोजीत भाजपाच्या अधिवेशनात बोलत होते.
हनुमान उडी घ्यायची आहे : "आपल्याला भारत विकसित देश करायचा आहे हे आपलं स्वप्न आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांची खूप मोठी भूमिका असणार आहे. पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. आपल्याला जर अशी हनुमान उडी घ्यायची असेल तर सरकारमध्ये भाजपा परत येणं आवश्यक आहे. हे विसरु नका असं म्हणत पंतप्रधानांनी एकप्रकारे भाजपाला मतदान करण्याचं आवाहनच केलं आहे.
मध्यमवर्गीयांचं आयुष्य बदललं : "आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीए सरकार चारशे पारच्या घोषणा देत आहेत. असं म्हणत आपल्याला हे लक्ष गाठायचं असेल तर भाजपाला 370 जागा जिंकाव्याच लागतील असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. अनेकदा लोक मला सांगतात तुम्ही इतकं सगळं केल. आता कशाला धावपळ करता? त्यावर मी सांगतो दहा वर्षात निष्कलंक कार्यकाळ दिला आहे. 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं आहे. आपण आपल्या देशाल्या महाघोटाळ्यांमधून आणि दहशतवादी हल्यांमधून मुक्ती दिली आहे. आपण गरीब आणि मध्यमवर्गीयांचं आयुष्य यांचा स्तर उंचावून दाखवल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
आपला संकल्पही मोठाच : "देशातल्या कोट्यवधी युवकांचं, तरुण-रुणींची स्वप्नं हाच माझा संकल्प आहे. आपण सगळे सेवाभावातून दिवसरात्र एक करुन काम करत आहोत. मागच्या दहा वर्षांत जे आपण केलं ते एखाद्या टप्प्याप्रमाणे आहे. आता आपल्याला देशासाठी मोठं लक्ष्य गाठायचं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याकडे नवे संकल्प आहेत. त्यासाठी अनेक निर्णय घेणं बाकी आहे. त्यामुळे मी तिसरी टर्म मागतो आहे," असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
श्वेतपत्रिका प्रसिद्ध : भारतीय जनता पक्षाकडून आजच्या या राष्ट्रीय अधिवेशनात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कार्यकाळातील भारतीय अर्थव्यवस्थेवरील 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध करण्यात आली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळाच्या विरोधात भाजपाने नुकतीच श्वेतपत्रिकाही संसदेत आणली होती. त्यात यूपीए सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील कथित आर्थिक अनियमिततेचा तपशील नोंदवण्यात आला आहे.