नवी दिल्ली White Paper On UPA : मोदी सरकारनं यूपीए सरकारच्या काळात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात लोकसभा आणि राज्यसभेत 'श्वेतपत्रिका' आणली आहे. एनडीए सरकारच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका सादर केली. आता शुक्रवारी दुपारी 12 वाजल्यापासून लोकसभेत यावर चर्चा सुरू होऊ शकते.
श्वेतपत्रिकेवर चर्चा : मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत नियम 342 अंतर्गत श्वेतपत्रिकेवर चर्चा होणार आहे. शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर यावरील चर्चेला सुरुवात होईल. सुमारे 4 तास हा वाद सुरू राहणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेला उत्तर देतील. 2014 च्या आधी (मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी) देशासमोर कोणत्या प्रकारचे आर्थिक आणि वित्तीय संकट होतं, हे या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सांगितलं जाईल. याशिवाय मोदी सरकारनं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, हे देखील सांगितलं जाईल.
15 घोटाळ्यांचा उल्लेख : केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप भाजपानं वारंवार केला आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा यावरुन आक्रमक होताना दिसत आहे. या मुद्द्यावर पक्ष 'श्वेतपत्रिका' जारी करुन प्रत्येक राज्यात अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या माध्यमातून भाजपा मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करेल, की मागील सत्ताधारी आघाडीमुळे देशात आर्थिक संकट कसं निर्माण झालं आणि यूपीए सरकार भ्रष्टाचारात कसं गुंतलं होतं. या श्वेतपत्रिकेत यूपीएच्या काळात झालेल्या 15 घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा इत्यादींचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी रोडमॅप : भाजपाच्या एका उच्चपदस्थ सूत्रानं सांगितलं की, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाजपाचे राज्यातील नेते यूपीएविरोधातील केंद्राची 'श्वेतपत्रिका' पत्रकार परिषदा, पथ सभा आणि इतर मंचांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतील. सूत्रानं सांगितलं की, भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली रणनीती आणि निवडणूक रोडमॅप तयार केला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनं जवळपास 60 पानांच्या 'श्वेतपत्रिके'मध्ये म्हटलं आहे की, 2014 मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आलं, तेव्हा अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत होती. सार्वजनिक वित्त खराब स्थितीत होतं. तसेच आर्थिक गैरव्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता.
हे वाचलंत का :
- भारतीय अर्थव्यवस्थेवर लोकसभेत श्वेतपत्रिका, UPA सरकारच्या घोटाळ्याचा अर्थमंत्र्यांनी वाचला पाढा