महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का; खासदारानं धरला काँग्रेसचा 'हात'

MP Brijendra Singh join Congress : हरियाणातील हिसारचे भाजपा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालाय. त्यामुळं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी हा धक्का मानला जातोय.

खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खासदार ब्रिजेंद्र सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 5:37 PM IST

चंदीगड MP Brijendra Singh join Congress : हरियाणाच्या राजकारणातील मोठं नाव हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा प्रक्षप्रवेश झालाय. ब्रिजेंद्र सिंह यांनी 'आयएएस'ची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. 2014 मध्ये ते हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.

भाजपा वरिष्ठांचे मानले आभार : काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याअगोदर ब्रिजेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विट)वर पोस्ट करून भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. राजकीय कारणांमुळं मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं ब्रिजेंद्र सिंह यांनी सांगितलं. "मला हिसारचे खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष (भाजपा) तसंच पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो," असंही ते यावेळी म्हणाले.

नोकरशहा-राजकारणी बनले : हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर भाजपानं सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. हिसारमधून भाजपाचे उमेदवार ब्रिजेंद्र सिंह यांनी 3 लाख 14 हजार 68 मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजेंद्र सिंह यांनी हिसार लोकसभा मतदारसंघात जेजेपीचे दुष्यंत चौटाला आणि त्यावेळी काँग्रेससोबत असलेले भव्य बिश्नोई यांचा पराभव करून विजय मिळवला होता. ब्रिजेंद्र सिंह यांनी IAS ची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता.

हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार : ब्रिजेंद्र सिंह माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत. आयएएसची नोकरी सोडून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. ब्रिजेंद्र सिंह यांचे वडील बिरेंद्र सिंह 2022 पर्यंत राज्यसभा सदस्य होते. 1977, 1982, 1994, 1996 आणि 2005 असे पाच वेळा ते उचाना येथून आमदार म्हणून निवडून आले आणि तीन वेळा राज्य सरकारमध्ये मंत्री राहिले. 1984 मध्ये ओमप्रकाश चौटाला यांचा पराभव करून, बिरेंद्र सिंह हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details