बंगळुरू :कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदारांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी भाजपा आमदार तथा माजी राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी यांना गुरुवारी अटक करण्यात आली. हिरेबागेवाडी पोलिसांनी सी टी रवी यांना बेळगाव येथील सुवर्ण विधान सौध येथून अटक करून नंतर पोलीस ठाण्यात नेलं. कर्नाटकच्या महिला मंत्र्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर तासाभरात सी टी रवी यांना अटक करण्यात आली. भाजपा आमदाराला अटक केल्यानंतर मात्र कर्नाटकमधील राजकारण चांगलंच तापलं आहे.
कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदारांची अश्लील टिप्पणी :कर्नाटकच्या महिला मंत्र्यांवर भाजपा आमदार सी टी रवी यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सी टी रवी यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर कर्नाटकचं राजकारण चांगलंच तापलं. महिला मंत्र्यांनी सी टी रवी यांच्यावर आरोप करत त्यांच्याविरोधात हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन सी टी रवी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात कलम 75 (लैंगिकदृष्ट्या अयोग्य टिप्पणी केल्याबद्दल) आणि 79 (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान करण्यासाठी शब्द वापरल्याबद्दल) अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.