नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा केली. त्यानंतर सगळ्याच पक्षानं आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली. भाजपानं उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीचं आज संध्याकाळी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात आयोजन केलं आहे. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्योग मंत्री पियुष गोयल, भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी तथा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपा नेते उपस्थित राहणार आहेत.
आज केंद्रीय निवडणूक समितीची बैठक :आगामी विधानसभा निवडणूक 2024 ची तयारी करण्यासाठी आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ भाजपा नेते उपस्थित राहणार आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली. ते म्हणाले की, "आज केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत भाजपाच्या जागेवर चर्चा होणार आहे. आमच्या पक्षाच्या बहुतांश जागा निश्चित झाल्या असून काही जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवार यांच्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यांनी दावा केलेल्या जागांवर निर्णय घ्यावा लागेल."