रांची : झारखंडमध्ये देवाप्रमाणे बिरसा मुंडा यांची पूजा केली जाते. बिरसा मुंडा यांची आज 150 वी जयंती आहे. त्यांची जयंती 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरी करण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आज विविध कार्यक्रमात सहभागी होऊन बिरसा मुंडा यांना वंदन करणार आहेत.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या नावानं सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. संसद भवन संकुलातील बिरसा मुंडा यांचा पुतळा ठेवण्यात आलेला आहे. बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर 1875 रोजी तत्कालीन रांची आणि आजच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहाटू गावात आदिवासी कुटुंबात जन्म झाला. बिरसाच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी मुंडा होते. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. इंग्रजांकडून भारतीयांवर आणि भारतीय समाजावर अत्याचार करण्यात होते. हे पाहून त्यांनी शालेय जीवनापासून इंग्रज सरकारविरोधात लढा उभारण्याचा निश्चय केला. इंग्रजांचा जनतेवरील अन्याय सहन न झाल्यानं त्यांनी आयुष्यभर इंग्रजांविरोधात संघर्ष केला. 1894 मध्ये छोटा नागपूर भागात दुष्काळ आणि महामारी आल्यानंतर जनतेचे प्रचंड हाल झाला. अशा काळात बिरसा मुंडा यांनी जनतेची खूप सेवा केली.
दोन वर्षे तुरुंगात-एकीकडं जनतेचा हाल दुसरीकडं इंग्रजांचा जुलूम अशा स्थिती बिरसा यांनी जनतेवरील कर माफीसाठी इंग्रजांविरुद्ध थेट आंदोलन सुरू केले. बिरसांची वाढती लोकप्रियता इंग्रजाच्या डोळ्यात खुपत होती. त्यांनी दडपशाहीचा वापर करून 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात पाठवले. बिरसा मुंडा येथे सुमारे दोन वर्षे बंदिस्त राहिले. 1897 ते 1900 या काळात ब्रिटिश आणि मुंडा यांच्यात युद्धे झाली.
बिरसा मुंडा आणि इंग्रज यांच्यात खुंटी येथे युद्ध-ऑगस्ट 1897 मध्ये, बिरसा मुंडा आणि त्यांच्या सुमारे 400 सहकाऱ्यांनी अत्यंत धैर्य दाखवित धनुष्य-बाणांसह खुंटी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. 1898 मध्ये टांगा नदीच्या काठावर मुंडासंह त्यांचे सहकारी आणि इंग्रज यांच्यात प्रचंड संघर्ष झाला. या लढाईत इंग्रज सैन्याचा मानहानीकारक पराभव झाला. परंतु इंग्रजांनी वचपा काढण्याकरिता अनेक आदिवासी नेत्यांना अटक करत कारवाई करण्यास सुरुवात केली. यानंतर 1900 साली डोंबाडी टेकडीवर दुसरे युद्ध झालं. या लढ्यात अनेक महिलांसह निष्पाप अशा लहान मुलांचा मृत्यू झाला.
रांचीमध्ये घेतला अखेरचा श्वास-बिरसा मुंडा यांनी युद्ध करून इंग्रजांना जेरीस आणलं होतं. त्यामुळे फेब्रुवारी 1900 मध्ये इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथून अटक करून रांची तुरुंगात डांबले. येथेच 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाल्याचं इंग्रज सरकारनं सांगितलं. मात्र, त्यावेळी कॉलराची कोणतीही लक्षणे दिसली नसल्याचां अनेकांचे म्हणणे आहे. वयाच्या 25 व्या वर्षे मुंडा यांचा मृत्यू झाला.