महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्येतील भक्त निवासाकरिता महाराष्ट्र सरकार खर्च करणार २५० कोटी, कसे असणार बांधकाम? - AYODHYA MAHARASHTRA BHAVAN

अयोध्येत निवास विकास परिषदकडून महाराष्ट्र सरकारला अडीच एकर जमीन देण्यात आली आहे. या जमिनीवर भक्तनिवास बांधण्याकरिता मंगळवारी भूमीपूजन करण्यात आलं.

Maharashtra Bhavan Bhumi Pujan
अयोध्येत बांधण्यात येणार महाराष्ट्र भवन (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2024, 7:43 AM IST

अयोध्या-भगवान श्रीरामाची जन्मभूमी मानल्या जाणाऱ्या अयोध्येत महाराष्ट्र सरकारकडून भव्य असे भक्त निवास बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी केले. येत्या दोन वर्षात या भक्तनिवासाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

ग्रीन फील्ड डाऊन योजनेतंर्गत शाहनवाजपूरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात येणार आहे. वैदिक आचार्यांच्या मंत्रोचरणात मंगळवारी भूमी पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह राज्य सरकारचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे आमदार वेद प्रकाश गुप्ता, महापौर गिरीश पती त्रिपाठी, माजी आमदार गोरखनाथ बाबा उपस्थित होते.

अयोध्येत बांधण्यात येणार महाराष्ट्र भवन (Source- ETV Bharat Reporter)

९६ व्हीआयपी आणि ४ व्हीव्हीआयपी रुम असणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर प्रथम हनुमान गढी आणि रामललाचे दर्शन घेतले. मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवनचे काम करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी योगी सरकारकडून शरयू तटाजवळ अडीच एकर जमीन देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं १२ मजली भक्त निवास बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ९६ व्हीआयपी रुम, ४ व्हीव्हीआयपी रुम आणि ५० लोकांची क्षमता असलेली ड्रामेट्री रुम बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर दोन किचन आणि एक रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे. हे भक्त सदन महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून येणाऱ्या भक्तांसाठी खुले असणार आहे.

तीन राज्यांनी घेतली जमीन- अयोध्येचे आमदार वेद प्रकाश गुप्ता यांनी महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. अयोध्यानगरी जागतिक पातळीवरील नगरी करण्याचा पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा संकल्प आहे. महाराष्ट्रासह उत्तराखंड आणि गुजरात सरकारनं भक्तनिवासासाठी जमीन खरेदी केली आहे. अयोध्या हे शहर धार्मिक, सांस्कृतिकसह पर्यटन नगरी म्हणून विकसित होत आहे. अयोध्येत येण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सहा पदरी रस्ते आणि नवीन अयोध्या विकसित करण्यासाठी काम करण्यात येत असल्याची माहिती आमदार गुप्ता यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details