जयपूर Ram Idol On Pencil : राजस्थानातील एका रामभक्त शिल्पकारानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. या व्यक्तीनं चक्क एका पेन्सिलच्या टोकावर रामाच्या मूर्ती तयार केली!
मूर्ती केवळ 1.3 सेमी उंच : जयपूरच्या महेश नगर येथील रहिवासी नवरत्न प्रजापती यांनी ही कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले. ही मूर्ती केवळ 1.3 सेमी उंच आहे. मूर्तीच्या हातात अयोध्येच्या राममंदिरातील मूर्तीप्रमाणे धनुष्य आणि बाण आहे.
राम संग्रहालयाला भेट द्यायची आहे : प्रजापती म्हणाले की, त्यांना ही कलाकृती राम संग्रहालयात प्रदर्शनासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला भेट द्यायची आहे. प्रजापती यांनी गेल्या वर्षी 1.6 मिमी आकाराचा जगातील सर्वात लहान लाकडी चमचा तयार करून विक्रम केला होता. त्यांनी चाकू आणि सर्जिकल ब्लेडचा वापर करून एकाच लाकडी तुकड्यातून चमचा बनवला होता.
याआधी यांच्या मूर्ती बनवल्या :नवरत्न प्रजापती यांनी या आधी गणपती, भगवान महावीर स्वामी, महाराणा प्रताप, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पेन्सिलच्या टोकावर लघु मॉडेल तयार केलं आहे. याशिवाय, गळ्यात सहज परिधान करता येईल अशा 101 लिंक्सचं साखळी शिल्पही त्यांनी बनवलं होतं.
पार्ले-जी बिस्किटांनी मंदिराची प्रतिकृती : यापूर्वी पुष्कर येथील वाळू कलाकार अजय रावत यांनी 25 फूट लांब आणि 30 फूट रुंद अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. तर पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीनं पार्ले-जी बिस्किटांनी मंदिराची प्रतिकृती तयार केली होती.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा : सोमवारी, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी गर्भगृहात मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.
हे वाचलंत का :
- श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- कोण होते जिल्हाधिकारी के के नायर, ज्यांनी राम मंदिरासाठी चक्क पंतप्रधान नेहरूंचा आदेश धूडकावून लावला!